Saturday, July 31, 2010

शब्द

पहाटेची वेळ होती मी पुण्याच्या वल्लभनगर बसस्थानकावर उतरलो होतो. आदली पूर्ण रात्र मी महाराष्ट्र शासनाच्या बससेवेचा बळी झालो होतो. बाहेर थंडी होती आणि नेमका अंगावर स्वेटर नव्हता. खिशातला हातरुमाल कानाला बांधून मी गेटच्या दिशेने चालू लागलो. पाठीवरची पिशवी आज मला ढालीसारखी वाटत होती.

एवढ्या सकाळी भोसरीला जाण्यासाठी पी एम टी मिळणार नाही याचा अंदाज होता त्यामुळे रिक्षाच्या थांब्याकडे वळलो. सावजानं चालून शिकाऱ्याच्या जाळ्यात जावं अगदी तसा मी त्यांच्याकडे गेलो.दोन-तीन रिक्षे होते त्यात रीक्षेवाले पहुडले होते. पहिल्या रिक्षातला रिक्षावाला घोरत होता त्याची झोपमोड करणे नकोसे वाटत होते पण इलाज नव्हता.त्याला जागे करून मी विचारले इंद्रायणीनगर येणार का? तो डोळे चोळत म्हणाला ‘एकशेवीस रुपये होतील.’ एरवी बारा रुपयात जाऊ शकणाऱ्या ठिकाणासाठी एकशेवीस रुपये खुपच जास्त होते. पण बाहेर थंडी आणि होती आणि कचेरीत जाण्यापूर्वी मला थोडीशी विश्रांती आवश्यक होती त्यामुळे मी त्याचाशी सौदा करण्यासाठी तयार झालो. मी ऐंशी रुपये सांगितले,तो शंभर म्हणाला; मी माझ्या शब्दावर ठाम राहिलो कारण ऐंशी रुपये हीच मुळात खूप जास्त रक्कम होती. तो तयार होईना शेवटी मी तिथून निघून महामार्गाकडे जात होतो, इतक्यात त्याचा पाठीमागून आवाज आला ‘चल चल बस’. मी रिक्षात बसलो त्याने विचारले ‘इंद्रायणी नगरमध्ये कुठे जायचे आहे? मी म्हणालो ‘द्वारकाविश्व रेसिडन्सी’. मी त्याला बोललो ‘मी तुम्हाला सांगेन,स्वामी समर्थ शाळा माहित आहे ना तीथे अगदी जवळ पाच मिनिटाच्या अंतरावर आहे.’

त्याने रिक्षा चालू केली. मी थोडीशी डुलकी घेतली आणि टेल्को रोड सोडून रिक्षा आत वळली. थोड्याच वेळात स्वामी समर्थ शाळा आली आणि त्याने रिक्षा उभी केली. मी त्याला सांगितले कि माझे घर इथून अजून पुढे आहे. त्यावर तो बोलला 'तूच सांगितले ना स्वामी समर्थ शाळा मग...? इथून पुढे जायचे असेल तर वेगळे पैसे पडतील.'

माझ्याकडून जास्त पैसे लाटण्याचा त्याचा डाव माझ्या लक्षात आला. मला रिक्षावाल्याचा या कृतीचा मनातून राग आला. माझ्याकडे त्याला भाडणे,जास्त पैसे देऊन घरापर्यंत जाणे,किंवा ऐंशी रुपये देऊन तिथेच उतरणे असे पर्याय होते.रात्रभराच्या प्रवासाने आधीच माझी अवस्था चीडचीड झाली होती पण सकाळी सकाळी मी त्याच्याशी भांडत बसण्याच्या मनस्थितीत नव्हतो.

रिक्षावाला किमान पंचेचाळीस वर्षाचा धडधाकट माणूस होता चेहऱ्यावरून तो अजिबात तो बिलकुल फसवेगिरी करणारा वाटत नव्हता केवळ दहा रुपयासाठी त्याने बेईमानी करावी ही गोष्ट मनाला पटत नव्हती. त्याच्यावर राग येण्यापेक्षा आता मला त्याची कीव येत होती. माझ्यासारख्या माणसाला कुणाला तरी दिलेल्या शब्द मोडण्याची किंमत केवळ दहा रुपये इतकी क्षुल्लक असू शकते ही गोष्ट पटत नव्हती. मी तसां घराच्या खूप जवळ आलो होतो ऐंशी रुपये देऊन तिथेच उतरणे माझ्या जास्त सोयीचे होते पण माझ्या मनातली घालमेल मला ते करण्याची परवानगी देत नव्हती.

मी त्याला विचारले, ‘पुढे घरापर्यंत येण्यासाठी किती पैसे घेणार?’ तो बोलला ‘दहा रुपये.’ मी म्हणालो ‘चला मी देतो दहा रुपये जास्तीचे.’

त्याने पुन्हा रिक्षा चालू केली आणि मला माझ्या इमारतीसमोर आणून सोडले.मी खिशातून शंभर रुपये काढले आणि त्याला दिले.तो खिशातील नोटांच्या पुडग्यातील दहा रुपयाची नोट मला परत देत होता तोपर्यंत मी आणखी वीस रुपयांची नोट त्याच्याकडे केली. तो म्हणाला ‘तू शंभर दिलेस ना मग हे कसले वीस?’ मी म्हणालो ‘ते दहा रुपये ठेवा आणि तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे कदाचित तुम्हाला एकशेवीस रुपयाला इथपर्यंत येणे परवडत होते तर हे वरचे वीसही ठेवा. पण काका एक विनंती आहे दहा-वीस रुपयासाठी कोणाला दिली जबान अशी बदलू नका.’

रिक्षावाला माझ्या चेहऱ्याकडे पाहत होता. माझ्या चेहऱ्यावर त्याला कसलीही घृणा किंवा उपकाराची भावना दिसत नव्हती होती ती केवळ एक तळमळ,दिला शब्द जपण्यासाठी केलेली विनंती. एक सविनय सल्ला.

द्वारकाविश्वच्या गेटवरचा सुरक्षा रक्षकही दुरून हे पाहत होता,ऐकत होता. दुसऱ्याच क्षणात रिक्षावाला रिक्षाच्या बाहेर आला त्याच्या चेहऱ्यावर एक विस्मयाची छटा होती. त्याच्या डोळ्यात निराळे भाव होते.तो वीस रुपये पुढे करत म्हणाला ‘साहेब (!) मला फक्त ऐंशीच द्या वरचे दहा नकोत’. त्याच्या या अनपेक्षित वागण्याने मी अवाक झालो. पुढे काही म्हणण्याआधीच तो माझ्या हातात वीसरुपये देऊन मोकळा झाला. त्याने नजरानजर न करता रिक्षाला किक मारली.

न राहवून गेटवरचा सुरक्षारक्षक काय घडले याची माझ्याकडे चौकशी करू लागला. मी त्याला पूर्ण तपशील दिला नाही. पण इतक मात्र म्हणालो ‘पुण्यात असे रिक्षावाले खूप कमी आहेत!’ मी त्याच्या पाठमोऱ्या रिक्षाला रस्त्यावरच्या दिव्याच्या उजेडात पहिले त्यावर लिहिले होते ‘फिर मिलेंगे’.

Tuesday, April 20, 2010

Monday, April 12, 2010

मंगेश पाडगावकर म्हणाले....

http://72.78.249.107/esakal/20100102/5158920796419385935.htm
जागतिक मराठी अकादमीच्यावतीने सोलापुरात आज (शनिवार) 'शोध मराठी मनाचा' संमेलन सुरू झाले. या संमेलनाचे अध्यक्ष कवीवर्य मंगेश पाडगावकर यांचे अध्यक्षीय भाषण इथे देत आहोत:
----------------------------------------
सिंधुदुर्ग जिल्ह्यात समुद्राच्या काठाशी वेंगुर्ला हे एक लहानसं खेडं आहे. निसर्ग सौंदर्याचा नमुना म्हणावं असं हे गाव आहे. 81 वर्षांपूर्वी तिथे माझा जन्म झाला. तिथे अजूनही अनेक घरात वीज बल्ब आलेली नसेल! मी पाच वर्षांचा असताना आईने मला एक गाणं म्हणायला शिकवलं होतं. अष्टाक्षरी ओवी छंदात ते गाणं होतं.

नामदेवा पुत्र झाला;
विठू, यावे वारशाळा;
साडीचोळी राजाईला,
अंग्‌डी टोप्‌डी या बाळाला !

"या बाळाला' असं म्हणताना हात छातीकडे नेण्याचा अभिनय होता. आई मला सांगायची की, अनेकदा हे गाणं म्हणताना त्याचा छंद बदलून मी ते म्हणत असे. पण ते गाणं मी चुकीचं म्हणतो आहे असं सांगणं माझ्या आईला शक्‍य होत नसे. कारण मी म्हणत असे तेही छंदात. मी मधेच गाणं गझल सदृश छंदात म्हणायचो. हा छंद तेव्हा मी कधीच ऐकलेला नव्हता. त्यामुळे माझ्या आईला अतिशय आश्‍चर्य वाटलं होतं.
ज्या क्षणी खेळता खेळता मी हे गाणं छंद बदलून म्हटलं त्या क्षणी प्रथमच मी मला सापडलो. माझं आयुष्य छंदोबद्ध होणार हे त्या क्षणी ठरलं. त्या क्षणी छंदातलं पहिलं पाऊल मी टाकलं. वयाची ८० वर्षे संपली तरीही चाल अजून बदललेली नाही. मी कविता लिहितोच आहे. विठूला बारशाचं निमंत्रण मी अजूनही छंदात देतो आहे! अशा एका छोट्या खेड्यातल्या छंदवेड्या छोट्या माणसाला अकादमीने जागतिक मराठी "शोध मराठी मनाचा' या संमेलनाला खास आमंत्रण देऊन बोलवावं याचं मला आश्‍चर्य वाटतं! मी इथे आलो ते माझी योग्यता गृहीत धरून नव्हे; मी इथे आलो, कारण हे निमंत्रण प्रेमाने दिलेले होतं. माझ्या मराठी मनाचा शोध प्रथम मला इथेच लागला. जिथे प्रेम दिसेल तिथे मराठी माणूस लोभावून जातो.

मराठीची बोली असलेली मालवणी कोकणी आणि मराठी या माझ्या मातृभाषा आहेत. एक मायबोली आणि एक मायभाषा इ. जवळजवळ बारा कोटी लोक मराठी भाषा बोलतात. मी भाषेचं बळ केवळ संख्येने मोजत नाही. "नामदेवा पुत्र झाला' हे गाण माझ्या बोबड्या शब्दात मी ज्या भाषेत म्हटलं त्या भाषेच्या मागे ज्ञानेश्‍वर, तुकाराम आणि अनेक प्रतिभाशाली संत कवींची कविता उभी आहे. अनेक आक्रमणांना हिने तोंड दिलं. ही आक्रमणं राजकीय, आर्थिक, धार्मिक अशी अनेक प्रकारची असतात. पण या शूर मराठी भाषेने या सर्व आक्रमणांना तोंड दिल, आणि अमृतातही पैजा जिंके असं पसायदान देतही उभी राहिली. पारतंत्र्याच्या काळात आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपण मराठी आणि इंग्रजी या दोन भाषा प्रत्यक्षात स्वीकारल्या. हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून आपल्या सोबतीला होतीच. इंग्रजी भाषेची गुलामी आपण स्वीकारली असं मी मुळीच मानत नाही. भाषेची गुलामी आपण स्वीकारली असं मी मुळीच मानत नाही. इंग्रजी भाषेतून आपण सत्त्व मिळवलं ते मराठी भाषा पुष्ट करण्यासाठी. हे सत्त्व घेताना आपण स्वत्व सोडलं नाही.
सत्त्व घेतलं आणि स्वत्व राखलं असं मी म्हटलं खरं, पण आता माझं हे विधान तपासून घ्याव असं मला वाटू लागलं आहे. माझ्या नातवंडांना मालवणी कोकणी बोलता येत नाही. त्यांचं शिक्षण इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून झालं आहे. त्यांना मराठी बोलण्यापुरतं येतं. मराठी साहित्य, यात त्यांच्या आजोबांच्या कविता आल्या. त्यांच्या वाचनात येत नाही. इंग्रजी भाषेला त्यांच्या पिढीने जवळ केलं ते ज्ञानाच्या प्रेमाने नाही. इंग्रजी भाषा आली की, चांगल्या नोकऱ्या मिळतात, परदेशी जाऊन शिक्षण घेता येतं आणि आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करता येतात म्हणून. ही बहुतेक मुलं मराठी साहित्य वाचीत नाहीत तसेच इंग्रजी साहित्य बाचीत नाहीत. या बाबतीत ती भेदभाव मुळीच करीत नाहीत.
या गोष्टीला केवळ तीच जबाबदार आहेत असं मी म्हणणार नाही. घरातली वडील माणसं मराठी पुस्तक विकत घेताना, वाचताना, आवडीच्या मराठी पुस्तकांची छोटीशी लायब्ररी घरात करताना त्यांनी कधी पाहिलेलीच नाहीत. आर्थिक परिस्थिती उत्तम असलेल्या अनेक मराठी घरात मराठी पुस्तक दिसत नाही, हे मी स्वतः पाहिलं आहे. या यशस्वी मराठी माणसांना चांगलं फर्निचर घेण्याची घाई असते. अर्थातच तिथे चांगल्या मराठी पुस्तकांना वावही नसतो आणि भावही नसतो. कित्येक घरात तर मराठी मातृभाषा असूनही आई-वडील आणि मुलं इंग्रजी बोलत असतात. याचं कारण, इंग्रजीत बोलणे म्हणजे कोणीतरी विशेष असणं ही खोटी कल्पना हे होय. शाळेतून मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं तरी ही खोटी इंग्रजी ऐट कशी दूर करणार? मराठी उत्तम बोलता आल्याशिवाय, मराठी पुस्तकांचं वाचन असल्याशिवाय महाराष्ट्रात कुणालाही नोकरी मिळू शकत नाही असं जर झालं, तर ही सगळी माणसं मराठी बोलू वाचू लागतील. कारण भाषेचा उपयोग नोकरी मिळवण्यासाठी असतो इतकंच यांना ठाऊक आहे. पण तशी परिस्थिती आज नाही आणि उद्या असेल असं वाटत नाही. शहरातली गोष्ट तर सोडाच पण खेड्यातल्या मुलांनाही असच वाटू लागलं आहे. शहरातली मुलं इंग्रजी शिकून आमच्यावर राज्य करतील असं त्यांना वाटतं. शहरातली मुलं करतात तसा पेहराव आणि इंग्रजी बोलणं त्यांना आकर्षक आणि मोठेपणाच लक्षण आहे असं वाटू लागलं आहे. भाषा ही ज्ञानाची खिडकी नसून ती दुकानाची खिडकी आहे. असं या मुलांना आणि त्यांच्या पालकांना वाटतं. इंग्रजी भाषेने सर्वांत मोठ्या दुकानाची खिडकी म्हणून त्यांच्या मनात मान्यता मिळवली आहे.

इंग्रजी भाषा शिकू नये असा याचा अर्थ नव्हे. मराठी भाषेचा उत्तम अभ्यास करावा, तिच्या विषयी रास्त अभिमान बाळगावा आणि मग इंग्रजी भाषा अवश्‍य शिकावी. ""नसे आज ऐश्‍वर्य या माउलीला' अशा परिस्थिती आज राहिलेली नाही. मराठी भाषा आज राजभाषा आहे. साहित्याचं ऐश्‍वर्यही तिच्याकडे आहे. या बाबतीत न्यूनगंड बाळगण्याचे मुळीच कारण नाही. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आपली मुलं शिकायला पाठवणाऱ्या बऱ्याच पालकांच्या ठिकाणी हा न्यूनगंड आहे असं मला वाटते.

मराठी मनाचा शोध घेताना हा न्यूनगंड मला तीव्रतेने जाणवतो. मी माझ्या मुलांना मराठी माध्यम असलेल्या आणि दादा रेगे यांच्यासारखा ऋषितुल्य माणूस तिचा मुख्याध्यापक असलेल्या शाळेत शिकायला पाठवलं. पण माझी सगळी नातवंडं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकली. इथे निर्णय घेण्याचा अधिकार मला नव्हता. आज मराठी माध्यमांच्या शाळांनी इंग्रजी माध्यमाचे वर्गही सुरू केले आहेत. त्यांनी अजून मराठी माध्यमाचे वर्ग बंद केलेले नाहीत. हे जरी खरं असलं, तरी नजीकच्या भविष्यकाळात मराठी वर्ग मुलं येत नाहीत म्हणून बंद करावे लागेल असं शाळाचालक सांगण्याची शक्‍यता आहे. मराठी माध्यमाच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी फारशी मुलं आलीच नाहीत तर हे वर्ग चालवणं परवडणार कसं ? म्हणून हे वर्ग बंद करणं प्राप्तच आहे. मराठी मनाचा शोध घेताना मराठी माध्यमाच्या शिक्षणवर्गाचाही शोध घेतला पाहिजे. या वर्गांमागे मराठी भाषेकडे म्हणजेच आपल्या मातृभाषेकडे पहाण्याचा मराठी समाजाचा दृष्टिकोन आहे. हा शोध लवकर घेतला पाहिजे. कारण शोध घ्यायला उशीर केला, तर कदाचित मराठी माध्यमाचे वर्गच अस्तित्वात नसल्यामुळे हा शोध घेणं शक्‍य होणार नाही.

मराठी भाषेवर प्रेम करणारा माणूसही आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत का पाठवतो याचं कारण उघड आहे. समाज आज ज्ञानाचं साधन म्हणून शिक्षणाकडे पहात नाही. अर्थार्जनाचा म्हणजे नोकरी मिळवण्याचे साधन म्हणून तो शिक्षणाकडे पाहतो. मराठी भाषेचे गोडवे कितीही गायले तरी इंग्रजी माध्यमाची शाळा हीच नोकऱ्या मिळवण्यासाठी साहाय्य करणारी ठरते. सरस्वती ही विद्येची देवता आता राहिलेली नसून लक्ष्मी ही विद्येची देवता झालेली आहे.

असं असलं, तरी अजूनही आपण सभा संमेलनातून व्यासपीठावरून मराठी भाषेत बोलतो ही आनंदाची गोष्ट आहे. जागतिक मराठी अकादमीने "शोध मराठी मनाचा' या संमेलनात अध्यक्षपद देऊन मला निमंत्रित केलं, यामुळे मी आज हा आनंद घेतला. याबद्दल मी अकादमीचे मराठी भाषेत मनःपूर्वक आभार मानतो. मराठी मनाचा शोध मला किती लागला हे मला ठाऊक नाही, पण तुमच्यासमोर मराठी भाषेत बोलण्याची संधी मला मिळाली याचा आनंद मला लाभला आहे हे निश्‍चित.

जागतिक मराठी अकादमीचे आणि सर्व श्रोत्यांचे पुन्हा एकदा आभार मानून माझं हे भाषण मी संपवितो.

- मंगेश पाडगांवकर

Sunday, April 11, 2010

मराठीचा अभिमन्यू!

दुसऱ्या भाषिकांपुढे आपल्या भाषेला सिद्ध करण्यापेक्षा आधी मराठी माणसाला तिच्यावर प्रेम करायला शिकवण्याची वेळ आली आली आहे हि एक शोकांतिका आहे.अशा काळात जे स्वतःला खरच शहाणे समजतात त्यांनी भाषा कशी समृद्ध करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. आपण काही योगदान देतोय का? आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

इंग्रजी माध्यमांच्या वाढत्या शाळा हे आजच्या महाराष्टाचे दुर्दैव नाही का? विज्ञान शाखेचे पूर्ण ज्ञान मराठीत नाही,चांगले पैसे देणाऱ्या नोकऱ्या इंग्रजीचे ज्ञान असल्याशिवाय मिळत नाहित त्यामुळे झक मारत आम्ही इंग्रजीतून शिकतो.

आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याची चैन कर्जांची टांगती तलवार डोक्यावर वागवणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारी नाही.दुर्दैवाने कित्येकासाठी हे परीस्थितीने लादलेले गाढवओझे ओढले जात नाही.मग आम्हीच आमच्या देशात तथाकथित 'non-eligible' ठरतो.हि आपल्याच घरात होणारी आपली कुचंबना नाही का? 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार का आणि कुठवर सोसायचा?

एका प्रश्नाचा हात धरून दुसरा,दुसऱ्याचा हात धरून तिसरा.प्रश्नांच्या या भोवऱ्यात आजच्या मराठी माणसाचा अभिमन्यू होत आहे.प्रश्न उदंड आहेत अन दुर्दैवाने उत्तरे खूप कमी. माणूस म्हणून प्रत्येकाला मर्यादा असतात पण तरीही जर कुणी काही प्रश्नांना का होईना त्याच्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला प्रोत्साहन दिलं तर बिघडलं कुठे? काही देण्यासाठी पुढे न सरसावणारे हात नुसत्या टाळ्याही वाजवू शकत नाहीत का?